सोयाबीन खरेदी बातमी | NAFED Soybean Registration | Soybean MSP 2026
सोयाबीनच्या हमीभावावर (MSP) खरेदी करण्यासाठी नाफेडमार्फत (NAFED Soybean Kharedi) सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचे दर शासनमान्य दरापेक्षा ८०० ते १,००० रुपयांनी कमी असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे वळत आहेत.
खासगी बाजारपेठेत दर घसरले; नाफेडकडे शेतकऱ्यांची गर्दी
सध्या खासगी बाजारात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ४,००० ते ४,२०० रुपये इतके आहेत. याउलट नाफेडमार्फत सोयाबीनची हमीभावाने प्रतिक्विंटल ५,३२८ रुपये दराने खरेदी सुरू आहे. या दरातील मोठ्या फरकामुळे नाफेडच्या केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.
नोंदणीला मुदतवाढ; प्रत्यक्ष खरेदी मात्र संथ
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत डीएमओकडून सुरुवातीला ३१ डिसेंबरपर्यंत असलेली नोंदणीची मुदत वाढवून आता ३१ जानेवारी २०२६ करण्यात आली आहे. नोंदणीला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी सोयाबीन खरेदीची गती मंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अमरावती जिल्ह्यात १६ केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू
अमरावती जिल्ह्यात डीएमओ अंतर्गत ८ आणि व्हीसीएमएफ अंतर्गत ८ अशी एकूण १६ केंद्रांवर नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी सुरू आहे. नोंदणी मुदतवाढीमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावाचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली असून, खरेदी प्रक्रियेला गती देण्याची मागणी होत आहे.


